ऐसा सोहळा नाही त्रिभुवणी,
कार्तिक पौर्णिमेस सूर्योदयाच्यावेळी सगुण साकार परमेश्वराचे स्वरूप असलेला छबिना एकदा पाहिला की पुन्हा दरवर्षी पाहण्याची आस लागतेच. विविध फुलांनी डोक्यावरील सजविलेला टोप, पीतांबरी वस्त्र परिधान केलेले, मनगटात तसेच दंडात आणि गळ्यात रूद्रांक्षाच्या माळा, अंगाला विभूती, दोन्ही हातात आरत्या धरलेला छबीना म्हणजे साक्षात परमेश्वराचेच स्वरूप होय.
श्री महांकाळेश्वराचे शिवनाम घेतल्यास काम-क्रोधादी विकार बाधत नाहीत. शिवाच्या केवळ दर्शनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ जीवला प्राप्त होतात. भगवान शिवाची कृपा जर जीवाला प्राप्त झाली तर जन्ममरण हे भवरोगातून मुक्त करतात. अशा या सासुरेतील श्री महांकाळेश्वराचे महात्म्य अगाध आहे. येथील यात्रा सोहळा त्रीभूवनी सुध्दा दिसणार नाही इतका दिमाखदार आहे. कार्तीक पौर्णिमेपासून पाच दिवस चालणार्या श्री महांकाळेश्वर यात्रा सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविक सहभागी होऊन श्री महांकाळेश्वराचे दर्शन घेतात. कार्तिक पौर्णिमेस सूर्योदयाच्यावेळी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला टोपाचा छबिना निघतो.
सगुण साकार परमेश्वराचे स्वरूप असलेला हा छबिना एकदा पाहिला की पुन्हा दरवर्षी पाहण्याची आस भाविकांना लागतेच. त्यामुळेे एकदा यात्रेला आलेला भाविक हा पुन्हा कधीच उत्सव चुकवत नाही. विविध फुलांनी डोक्यावरील सजविलेला टोप, पीतांबरी वस्त्र परिधान केलेले, मनगटात तसेच दंडात आणि गळ्यात रूद्रांक्षाच्या माळा, अंगाला विभूती, दोन्ही हातात आरत्या धरलेल्या साक्षात परमेश्वराचे स्वरूप असलेले छबिन्याचे दिव्यरूप, पाठीमागे अबदागिरी, पताका, समोर राळेच्या ज्वाला, शंखांचा निनाद, भूपाळ्यांचा गजर अशा मंगलमय अन् चैतन्यदायी वातावरणात छबिन्याची मंदिर प्रदक्षिणा होते. आणि यात्रा उत्सवास सुरुवात होते. लगेच नैवेद्य आणि आरत्या वाजत गाजत मंदिरात आणल्या जातात. दुपारी शेरण्या निघतात. आपल्या फडातील ऊस, साखर, पेढेे वाटले जातात. यावेळी गावातील तरुण मंडळे लेझीम, झांज, दोराचे खेळ सादर करतात. पुन्हा सायंकाळी छबिना निघतो. भजन-कीर्तन चालते तर यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरुंसाठी विविध मनोरंजनांच्या कार्यक्रमांची मेजवानी यात्रा कमिटीच्यावतीने दिली जातेे.
पाच दिवस चालणार्या या यात्रा उत्सवाची सांगता लळिताने होते. वर्षभर ज्या सणाची लेकीबाळींना, पोराथोरांना, पैलवानांना ओढ लागलेली असते त्या उत्सवात पै-पाहुण्यांच्या गाठीभेटी होतात. पुढच्या वर्षीसाठी उत्साह अन् उमेद देणारा हा महांकाळेश्वर यात्रा उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अशा या महांकाळेश्वराच्या चिंतनाने बुद्धीचा प्रकाश वाढू लागतो, पूर्वजांचा उद्धार होतो, चिताची चंचलता नष्ट होऊन हृदयाचे दारिद्य्र दूर होते आणि हृदयात शांती येते. एकटा सर्प मारला जातो पण तोच शंकराच्या गळ्यात असतो तेव्हा पुजला जातो, तसेच संसाराचा व्यवहार केवळ एकटे कराल तर मारले जाल, परंतु शिवतत्त्वात डूबकी मारून संसाराचा व्यवहार करला तर आपला व्यवहारी आदर्श व्यवहार होईल. शंकराच्या समतेच्या प्रभावामुळे शंकराकडे परस्परविरोधी स्वभावाचे प्राणीदेखील निर्धास्तपणे राहतात. त्यामुळे भगवान शंकराची अर्थात महांकाळेश्वराच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही.